स्वेरीच्या सामाजिक कार्यामुळे समाजात जनजागृती -झेप फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ.रेखा चौधरी.
स्वेरीत लो ‘वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे’ दिंडी व रिंगण सोहळा उत्साहात संपन्.
पंढरपूर- ‘स्वेरी ही शिक्षण संस्था समाजातील विविध ज्वलंत प्रश्न घेऊन सातत्याने जनजागृतीचे काम करत असते, हे मी ऐकले होते ते आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले. स्वेरी आपल्या कार्यातून पुढील पिढीला सांघिकता, वेशभूषा, संस्कार व नेतृत्व यांचे शिक्षण देत आहे. आज डिजिटल दिंडी साजरी करताना पुढील पिढीला संस्कार कसे करावे याचे या सांघिक कार्यक्रमातून उत्तमरीत्या सादर केले. आजच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात तरुणांचे बालपण मोबाईलमध्ये हरवत आहे. याला आज वाचवविण्याची गरज आहे. मी जवळपास ७५ देशात फिरले, माहिती घेतली तेंव्हा असे जाणवले की तरुण मुले हे सोशल मिडिया व स्मार्टफोनमुळे मनोरुग्ण होत आहेत.’ असे प्रतिपादन झेप फाउंडेशनच्या संस्थापिका व वर्ल्ड डिजिटल डेटॉक्स डे च्या संस्थापिका डॉ.रेखा चौधरी यांनी केले.
आषाढी वारी २०२६ निमित्त स्वेरीचे संस्थापक व डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि झेप फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे' निमित्त ‘डिजिटल डिटॉक्स दिंडी’ व स्वेरीच्या भव्य मैदानावर ‘गोल रिंगण’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रेखा चौधरी ह्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची विधिवत पूजा करून करण्यात आली. त्यानंतर पालखीची मिरवणूक स्वेरी कॅम्पस मधून वसतिगृह मार्गे स्वेरीच्या क्रीडांगणापर्यंत काढण्यात आली. पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या वातावरणात टाळ-मृदुंगाच्या गजरात ही दिंडी पार पडली. क्रीडांगणावर गोल रिंगण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंढेवाडी येथील ह.भ.प. श्री. नवनाथ महाराज व त्यांच्या भजनी मंडळाने सादर केलेल्या अभंग व भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला तसेच कोंढारकी भजनी मंडळाने देखील अप्रतिम अभंग व कीर्तनाचे सादरीकरण केले. पुढे संस्थापिका व डिजीटल संत डॉ. रेखा चौधरी यांनी ‘मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, त्याचा मानसिक आरोग्य, कौटुंबिक नाती आणि भारतीय संस्कृतीवर होणारा परिणाम’ आदी आवश्यक बाबींविषयी मार्गदर्शन करून डिजिटल साधनांचा विवेकपूर्ण वापर करण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमास डॉ.वैशाली चव्हाण, प्रीती निकम, पंढरपुरच्या डॉ.बी.पी.रोंगे हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे, स्वेरीचे विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून वारकरी परंपरेचे जतन करताना आधुनिक काळातील डिजिटल व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चौकट–विशाल शिरसकर, रोहन होर्ती, ओम बारगजे व आर्यन कुंभार या स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कॅम्पस मधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी यांच्या कपाळावर टिळा, बुक्का लावून नाम लावत होते. स्वेरीमध्ये श्री.विठ्ठल- रुक्मिणीच्या आकर्षक मूर्ती खूप सुंदर रितीने सजवलेल्या होत्या. दिंडीमध्येही विठ्ठलाची आकर्षक मूर्ती बसवली होती. परिसरात विठ्ठल नामाचा गजर होत होता. दोन ओळीत असलेली दिंडी पायी स्वेरीच्या बाहेर पडली तेथून वसतिगृह मार्गे भव्य मैदानावर आली. मैदानामध्ये गोल रिंगण, भजन-कीर्तन पार पडले. यावेळी विद्यार्थिनींनी गीते सादर केली तर डॉ. नीता तळवलकर यांनी विठ्लाची आरती गायली. विशेष म्हणजे स्वेरी परिवारातील महिला प्राध्यापक साडी मध्ये तर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी नेहरू शर्ट, पायजमा, टोपी सह वारकऱ्यांच्या वेशभूषेत होते. टाळ, ढोलकी, फुगड्या, अभंग कीर्तनाने स्वेरी कॅम्पस भक्तीमय झाला.