अभियंत्यांची गुणवत्ता समाजाच्या विकासाला गती देते .आयकर विभागाचे निरीक्षक राजानंद लोणकर

अभियंत्यांची गुणवत्ता समाजाच्या विकासाला गती देते .आयकर विभागाचे निरीक्षक राजानंद लोणकर

                                  

स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा

पंढरपूरः ‘अभियंत्यांची गुणवत्ता ही सुईच्या निर्मितीपासून ते अवकाशातील मिसाईलपर्यंतच्या प्रत्येक उपक्रमात दिसून येत असते. यामध्ये अभियंते एकाग्र होवून आपले सर्वस्व पणाला लावतात. यासाठी अभियांत्रिकी क्षेतातील प्रत्येक विभाग महत्वाचा असतो. यातून कोणतेही एक क्षेत्र निवडायचे आणि त्यात करिअर करायचे हे जर सूत्र ठेवले तर त्या विभागातील अधिकाधिक ज्ञान मिळायला मदत होते. म्हणून पदवीनंतर अभियंत्यांनी आपल्या क्षेत्रातील नवनवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा तसेच सिव्हील सर्विस सेक्टर मध्येही करिअर करावे. यासाठी पदवीनंतर सुरवातीचे एक दोन वर्षे कंपनीतील कामांचा अनुभव घ्यावा. त्यातून कामाची आवड निर्माण होते, कामात एकाग्रता निर्माण होते आणि विद्यार्थी अपडेट राहतो. एकूणच अभियंत्यांची गुणवत्ता ही समाजाच्या विकासाला योग्य दिशा आणि गती देत असते.' असे प्रतिपादन आयकर विभागाचे निरीक्षक राजानंद लोणकर यांनी केले.

         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या खुल्या रंगमंचावर भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६५ व्या जयंती निमित्त ‘अभियंता दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर विभागाच्या आयकर विभागाचे निरीक्षक राजानंद अर्जुन लोणकर हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशाही कॉलेज, शाहुवाडीचे डॉ.प्रकाश वाघमारे हे होते. सर विश्वेश्वरय्या यांची प्रतिमा पूजन, महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले की, ‘भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची सिव्हील विभागातील अतुलनीय कामगिरी पाहता यशस्वी अभियंत्यांची व्याख्या समजते. जन्म घेणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या जन्माला सार्थक कसे बनवायचे हे आपल्या हातात असते म्हणून जीवनाचे महत्व वाढवायचे असल्यास आपल्याला नेहमीच्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यासाठी अभियंत्यांनी प्रत्येक क्षेत्रात योगदान देण्याची तयारी ठेवावी. एकूणच आपण ध्येय ठरविल्यावर ‘कन्फर्ट झोन’च्या बाहेर जावून कार्य केल्यास यशाचा आनंद घेता येईल.’ असे सांगून उच्च शिक्षण घेताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याबाबत सांगितले. ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात गोल्ड मेडल मिळविलेल्या डॉ. तुषार वाघमारे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच दौलतराव विद्यालय, कासेगावचे प्रा. प्रकाश ठोंबरे व न्यू इंग्लिश स्कूल वेळापूरच्या सौ.शीतल काळे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक’ पुरस्कार देण्यात आले. यावेळी डॉ.सत्यवान माळी म्हणाले की, ‘अल्पावधीत उच्च स्थानी पोहचलेल्या स्वेरीचे विद्यार्थी यशस्वी का होतात? याचे उत्तर उलगडले कारण ‘हार्ड वर्क’ करणे हे येथील विद्यार्थ्यांच्या नसानसात भिनले आहे. अल्पावधीत स्वेरीची यशस्वी झेप, होत असलेले मार्गदर्शन यावरून यशाची व्याख्या समजते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.प्रकाश वाघमारे म्हणाले की, ‘ज्याप्रमाणे खर्डीच्या आप्पा सरांनी डॉ.रोंगे सरांना घडविले त्याप्रमाणे मला देखील अमोल मोरे सरांनी घडविले. दोघांत सेम संघर्ष आहे. बालपणी आप्पा सरांनी दिलेल्या स्फूर्तीमुळे डॉ.रोंगे सरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली त्यामुळे स्वेरीतील अनेक जण देश परदेशात यशस्वी करिअर करत आहेत तर स्वेरीतील अनेक विद्यार्थी परिश्रम घेवून करिअर उज्वल करत आहेत. ‘हार्ड वर्क करणे’ हे विद्यार्थी दशेत अंगवळणी लागले आहे.’ असे सांगून स्वेरीच्या संशोधन विभागाचे कौतुक केले. यावेळी स्वेरीतील अभियंत्यांचे सन्मान केले गेले. यामध्ये उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी तुकाराम वाघमारे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, सचिव डॉ.सुरज रोंगे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. तृप्ती चलवाड, सेजल ठाकूर व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एन. ए. तळवलकर यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थिनी सचिवा नेहा झिरपे यांनी आभार मानले.