स्वेरीच्या फैय्याज तांबोळी यांची आयट्रिपलई कडून तिहेरी आंतरराष्ट्रीय कामगिरी जागतिक स्तरावर भारताचा ठसा.
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी फैय्याज रफीक तांबोळी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग तीन मानाच्या कामगिरी करत महाविद्यालयासह भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.
स्वेरीच्या फैय्याज तांबोळी यांच्या ‘प्रोजेक्ट लाइफलाईन’ या नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पाला आय ट्रिपल ई अँटेना अँड प्रॉपॅगेशन सोसायटी (आयईईई एपीएस) कडून विशेष मान्यता मिळाली असून, प्रकल्पाच्या हार्डवेअर निर्मिती, प्रत्यक्ष चाचण्या आणि विकासासाठी तीन हजार अमेरिकन डॉलर्सचे संशोधन अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आय ट्रिपल ई एपीएस अनुदानासाठी संपूर्ण भारतातून स्वेरीचे फैय्याज तांबोळी हे एकमेव विद्यार्थी म्हणून निवडले गेले आहेत. याचबरोबर त्यांची आय ट्रिपल ई ह्युमॅनिटेरियन ॲक्टिव्हिटीज कमिटी (आय ट्रिपल ई हार्ट) आयोजित हार्डवेअर चॅलेंज स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेल्या केवळ दोन विद्यार्थ्यांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली असून, प्रकल्पाच्या प्रारंभिक विकासासाठी त्यांना एक हजार अमेरिकन डॉलर्सचे संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे. याशिवाय, फैय्याज तांबोळी यांची आय ट्रिपल ई उद्योजकता दूत (आय ट्रिपल ई इंटरप्रणरशिप अॅम्बॅसिडर) म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी मागील वर्षी फैय्याज तांबोळी यांची आयट्रिपलई १०च्या एडहॉक कमिटी ऑन इंटरप्रणरशिप अँड इनोव्हेशन (ए.सी.इ.आय.) अॅम्बॅसिडर प्रोग्राम २०२५ साठी देखील निवड झाली होती. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिनतारी दळणवळण, अँटेना रचना आणि मानवतावादी तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत आयईईईने हा सन्मान बहाल केला आहे. फैय्याज यांनी विकसित केलेला ‘प्रोजेक्ट लाइफलाईन’ हा प्रकल्प भूकंप, इमारती कोसळणे तसेच भूमिगत दुर्घटनांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक बिनतारी संवेदक जाळे (वायरलेस सेन्सर नेटवर्क) आणि विशेष फ्रॅक्टल अँटेना तंत्रज्ञानाचा वापर करतो. कमी खर्चात, कमी ऊर्जा वापरात आणि प्रतिकूल परिस्थितीतही कार्यक्षम राहणारी ही प्रणाली आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच आय ट्रिपल ई एपीएसकडून फैय्याज तांबोळी यांना अत्याधुनिक अँटेना व हार्डवेअर डिझाइन संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या ‘अॅन्सिस हार्डवेअर डिझाइन सॉफ्टवेअर’चा १२ महिन्यांचा विनामूल्य परवाना देखील प्रदान करण्यात आला आहे. या परवान्याची किंमत सुमारे १३,८५० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे रु ११.५ लाख) इतकी असून, या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अत्याधुनिक अँटेना डिझाइन, विद्युतचुंबकीय विश्लेषण आणि हार्डवेअर कार्यक्षमतेचे संशोधन जागतिक दर्जाच्या पातळीवर करता येणार आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल स्वेरीमध्ये फैय्याज तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संवाद साधताना संस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत सांगितले की, ‘ परिस्थिती कशी ही असली तरी घाबरू नका, तिचा सामना करा. ज्या क्षणी आपण भीतीला समोरे जातो, त्या क्षणी ती आपोआप नाहीशी होते. मोठी स्वप्ने पाहा, त्याचा पाठपुरावा करा यावर संशोधन करा, नवनवीन आव्हाने स्विकारा आणि जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करा.’ त्यांच्या या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. फैय्याज तांबोळी यांच्या या तीन महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय यशांमुळे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधनाची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असून, भारतीय विद्यार्थ्यांची संशोधन क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे हे मात्र नक्की ! फैय्याज तांबोळी यांचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी आयईईई विद्यार्थी शाखेचे समुपदेशक तसेच विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती यांनी फैय्याज तांबोळी यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आयईईई समन्वयक प्रा. स्मिता गावडे यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधन, नवोपक्रम आणि आयईईईच्या विविध जागतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. फैय्याज तांबोळी यांनी मिळविलेल्या यशाबद्धल संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, संस्थेअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, इंजिनिअरींगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ.नीता तळवलकर, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.