मंगळवेढा तालुक्यात पांडुरंग परिवाराच्या बैठकांचे सत्र सूरु,परिचारक समर्थकांचा उत्साह वाढला

मंगळवेढा तालुक्यात पांडुरंग परिवाराच्या बैठकांचे सत्र सूरु,परिचारक समर्थकांचा उत्साह वाढला

पंढरपूर/आगामी विधानसभा निवडणुकीत परिचारक गटाची भूमिका काय याची मोठी उत्सुकता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला लागून राहिल्याचे दिसून येते. 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने माजी आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांच्या समर्थकांना आमदार अवताडे यांच्या विजयासाठी आपली ताकद पानाला लावावी लागली होती. टिळक स्मारक मैदान येथे झालेल्या सभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या समर्थकांना मोठ्या मालकांची शपथ घालीत समाधान आवताडे यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. तर पोटनिवडणुकी वेळी उमेदवारी देताना पुढील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीवेळी आमदार अवताडे यांनी परिचारक यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करण्याचे देखील कबूल केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. आता आगामी विधानसभा निवडणूक माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी लढवावी असा आग्रह मागील काही दिवसापासून त्यांचे समर्थक करू लागल्याचे दिसून येत आहे. परिचारक यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसून येत आहेत तर अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चाही होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनाच उमेदवारी दिली जाणार की माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मैदानात उतरविले जाणार याबाबत अनिश्चितता कायम आहे

. नुकत्याच पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि माजी खासदार निंबाळकर यांच्यात उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच पाहावयास मिळाली होती. यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढविली आणि मोठ्या फरकाने जिंकली देखील. त्यावेळी भाजपने उमेदवारीचा टिळा वेळेत न सोडवल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली होती असेच म्हटले जाते. आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजप परिचारक की अवताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे वेळीच स्पष्ट नाही झाले तर परिचारक समर्थकांचा आग्रह पाहता परिचारक वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे.

          17 ऑगस्ट रोजी स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचा स्मृतिदिन असून याच दिवशी माजी आमदार प्रशांत परिचारक उमेश परिचारक यांनी आपला निर्णय जाहीर करावा असा आग्रह त्यांचे समर्थक सोशल मीडियावरून व्यक्त करताना दिसून येत आहेत. तर आता परिचारक यांनीही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत पावले उचलण्यास सुरुवात केली असून नुकतीच त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या हॉलमध्ये विविध गावातील पांडुरंग परिवाराच्या गाव पातळीवरील नेते आणि समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. निवडणूक अपक्ष लढवावी भाजपकडून लढवावी की तुतारी चिन्हावर लढवावी याबाबतही कानोसा घेतला जात असल्याची चर्चा आहे. तर मागील दोन काही दिवसापासून मंगळवेढा तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटातून पांडुरंग परिवाराच्या बैठका पार पडत असून यात माजी आमदार प्रशांत परिचारक हे समर्थकांच्या भावना जाणून घेत आपले मनोगत व्यक्त करताना दिसून येत आहेत. दिनांक 17 ऑगस्ट रोजी परिचारक आपला निर्णय नक्की जाहीर करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होऊ लागली आहे.