कार्तिकी यात्रेप्रमाणे माघ वारीचे नियोजन गहिनीनाथ महाराज औसेकर

कार्तिकी यात्रेप्रमाणे माघ वारीचे नियोजन गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर / प्रतिनिधी-

दि. 28:- दि. 02 ते 12 फेब्रुवारी दरम्यान माघ वारी संपन्न होत असून, दि. 8 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य विषय आहे. या यात्रेला येणा-या भाविकांना कार्तिकी यात्रेप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच माघ शुध्द 5 म्हणजे दि. 2 फेब्रुवारी रोजी परंपरेनुसार श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये वेळ वाढविण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. माघवारी पूर्व नियोजनाबाबत आज श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस मंदिर समितीचे सदस्य डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच पुरातत्व खात्याचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन व संवर्धन कामाचे ठेकेदार रमेश येवले तसेच मंदिर समितीचे विविध खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

कार्तिकी यात्रेप्रमाणे माघ वारीचे नियोजन करण्यात येणार असून, भाविकांना पत्रा शेड, दर्शन रांग, दर्शन मंडप याठिकाणी मुबलक सोयी - सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच जलद व सुकर दर्शन व्हावे यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. तसेच दि.2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी व नियोजन तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर स्थानिकांसाठी स. 6.00 ते 7.00 व रा. 10.00 ते 10.30 या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथून दर्शन व्यवस्था करणे, मंदिरातील सर्व लाकडी दरवाज्यांना मंदिर निधीतून किंवा देणगीदार भाविकांमार्फत चांदी लावणे, पालखी महामार्गावर कमान बसविणे, दर्शनरांगेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या वारसांना 1 लक्ष रूपयांची मदत, वयोवृध्द, विकलांग, गरोदर महिला इत्यादी भाविकांना सभामंडपातून प्राधान्याने दर्शन व्यवस्था इत्यादी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.